श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मुंबई : 2 नोव्हेंबर 2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन, आयोजनाची कामे वेळेत पूर्ण करावीत व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.

महापरिनिर्वाण दिनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गर्दी नियंत्रण, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता व आरोग्य सुविधांना प्राधान्य द्यावे. चैत्यभूमी परिसरात वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, सीसीटीव्ही आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवून 4 ते 6 डिसेंबरसाठी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच सर्व सुविधा यंदा १ डिसेंबरपासूनच उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा प्रसार करण्यासाठी 5 व 6 डिसेंबर रोजी ड्रोन शो, जीवनकार्यावरील प्रदर्शन व लघुपट आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. अनुयायांसाठी बेस्ट व एसटीच्या अतिरिक्त बसगाड्या तसेच ऐतिहासिक स्थळांच्या भेटीसाठी मोफत वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय पुस्तकांचे व बार्टीच्या योजनांचे माहिती स्टॉल, वृक्षारोपण आणि व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. प्रस्तावित संविधान मार्गासह चैत्यभूमी परिसरातील विकासकामे पूर्ण करणे आणि प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ‘लोकराज्य’ मासिकाचा विशेषांक नामवंत लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांसह प्रकाशित करण्याची सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, सहायक पोलीस आयुक्त मनोज जोशी, एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सागर पळसुले आणि संबंधित विभागांचे अधिकारी व समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.












