जागतिक ख्यातीचे पूज्य भंते कानसेन मोचिदा (जपान) व आंतरराष्ट्रीय मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी / नागपूर :24 नोव्हेंबर 2026.
शांतता, मानवकल्याण आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे अद्वितीय प्रतीक असलेल्या कामठी येथील वैभवसंपन्न व जागतिक कीर्तीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल (शांतीशिल्प) चा 27 वा वर्धापन दिन महोत्सव कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 24 ते 26 नोव्हेंबर 2026 दरम्यान अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.
कामठी येथे साकारलेले ड्रॅगन पॅलेस ही केवळ एक वास्तू नसून भारत आणि जपान यांच्यातील अतूट सांस्कृतिक, धम्म आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे जिवंत प्रतीक आहे. पूज्य भंते नोरिओ ओगावा आणि ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या या शांतीशिल्पाने जागतिक पर्यटनाच्या नकाशावर कामठी व महाराष्ट्राची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे. जगभरातील भाविक, अभ्यासक आणि पर्यटक येथे तथागत भगवान बुद्धांचा शांती व करुणेचा संदेश ग्रहण करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भेट देत असतात.


विशेष बुद्ध वंदना, धम्मदेसना व मुख्य समारंभ
महोत्सवाच्या मुख्य दिवशी, मंगळवार 24 नोव्हेंबर रोजी ड्रॅगन पॅलेसच्या मुख्य गाभाऱ्यात जपान येथील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना संपन्न होईल. त्यानंतर दुपारी 11:30 वाजता मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगभरातील नामवंत धम्मगुरू व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पुज्य भंते कानसेन मोचिदा (जपान)-अध्यक्ष इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन. संपूर्ण जपानसह जगभरात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 5 हजार बुद्ध विहारे कार्यरत आहेत, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पूज्य भंते कानसेन मोचिदा हे उपस्थित जनसमुदायाला जपानी व मराठी भाषेत विशेष धम्म मार्गदर्शन करतील.
पूज्य भंते तायकेन आओयामा-मिनोबुसान कुओन्जी टेम्पल, टोकियो, जपान, मॅडम वांगमो डिक्सी (अमेरिका)-(चीफ पॅट्रन – इंटरनॅशनल त्रिपिटक चँटिंग सेरेमनी) , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य मार्गदर्शनपर भाषण होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ ड्रॅगन पॅलेस धम्मभूमी’ रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन व विविध विकास कार्याचे शुभारंभ
या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस ‘धम्मभूमी’ रजत महोत्सवी स्मरणिकेचे विमोचन व विविध विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात येईल.

परिसरात नयनरम्य रोषणाई व जय्यत तयारी
24 ते 26 नोव्हेंबर या तीन दिवसीय महोत्सवादरम्यान संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसर मनमोहक व आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या देश-विदेशातील भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, माहिती कक्ष व मदत केंद्रांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी कामठी, नागपूर, संपूर्ण विदर्भ व देशभरातील बौद्ध उपासक-उपासिका, धम्मप्रेमी, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक, सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय महोत्सवास सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.










