परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य शामियान्याची उभारणी पूर्णत्वाकडे! जपान येथील पूज्य भंतेजींची प्रमुख उपस्थिती; तीन दिवस रंगणार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 19 नोव्हेंबर 2026. जागतिक शांतता, मैत्री आणि समृद्ध बौद्ध संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय केंद्र असलेल्या कामठी येथील विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’च्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजित तीन दिवसीय वर्धापन दिन सोहळ्याची भव्य पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देश-विदेशातील मान्यवर व लाखो भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसर नव्या तेजाने नटला असून तयारीची लगबग शिगेला पोहोचली आहे.
परिसराचे सौंदर्यीकरण आणि भव्य शामियान्याची उभारणी



कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 27 व्या औचित्य साधून संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. ड्रॅगन पॅलेसची मुख्य वास्तू, सभागृह, सज्जे आणि छतांची स्वच्छता तसेच आकर्षक रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात येत आहे. येणाऱ्या भाविकांच्या व पाहुण्यांच्या सुविधेसाठी भव्य-दिव्य शामियाना आणि प्रशस्त मंडपाची (पेंडॉल) उभारणी करण्यात येत आहे. संपूर्ण परिसराला मोहक रूप देण्यासाठी विविधरंगी सुगंधी फुलांची नयनरम्य सजावट करण्यात येत असून, मुख्य मार्गांवर व प्रांगणात 100 हून अधिक आकर्षक शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या मांडण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर झळाळून निघावा यासाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी बहुरंगी विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचे जातीने लक्ष
या महासोहळ्याच्या पूर्वतयारीत कोणताही उणेपणा राहू नये यासाठी ओगावा सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखाताई कुंभारे या स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रत्येक कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ड्रॅगन पॅलेसचे सर्व निष्ठावंत धम्मसेवक व धम्मसेविका दिवसरात्र अथक परिश्रम घेत आहेत. सुरक्षितता, स्वच्छता आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी विविध समित्या कार्यरत करण्यात आल्या आहेत.
जपानहून पूज्य भंतेजींचे आगमन; सांस्कृतिक मेजवानी!

भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जपान येथून आदरणीय भंतेजी (बौद्ध भिक्खू संघ) विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना व भाविकांना समृद्ध कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी अनुभवता येणार आहे.

सध्या ड्रॅगन पॅलेस परिसरातील ही सर्वंकष तयारी अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण कामठी शहरात या वर्धापन दिन पर्वाची कमालीची उत्सुकता आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.












