नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत सातत्याने उपक्रम!
नागपूर : 7 आँक्टोबर 2026.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी पदवीधरांच्या रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. मागील सहा वर्षांपासून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये पदवीधरांसाठी रोजगार मेळावे आयोजित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून अनेक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, हा वसा आगामी काळातही कायम ठेवण्याचा निर्धार ॲड. वंजारी यांनी व्यक्त केला आहे.
पदवीधर युवकांना शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी थेट कंपन्या आणि उमेदवार यांच्यातील दुवा निर्माण करण्याच्या उद्देशाने या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील कंपन्यांना एका व्यासपीठावर आणून पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. निवड झालेल्या उमेदवारांना अनेक ठिकाणी मेळाव्यातच ऑफर लेटर देण्यात आले. मागील सहा वर्षात झालेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो युवांना रोजगार प्राप्त झाला आहे.
“पदवी मिळाल्यानंतर युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे एवढीच माझी भूमिका नसून, या मतदारसंघातील पदवीधरांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याला माझे प्राधान्य आहे. गेल्या सहा वर्षांपासून सहाही जिल्ह्यांत रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. हा वसा पुढील काळातही सुरू ठेवणार असून, रोजगार मेळाव्यांची व्याप्ती आणखी वाढविणार आहे,” असे ॲड.अभिजित वंजारी यांनी सांगितले.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सहाही जिल्ह्यांतील पदवीधर युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भविष्यात अधिक कंपन्यांचा सहभाग वाढविण्याचे तसेच रोजगार मेळाव्यांचे स्वरूप अधिक व्यापक करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि करिअरच्या संधी हे पदवीधरांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय असून, या प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची भूमिका ॲड. वंजारी यांनी मांडली आहे. रोजगार मेळाव्यांमधून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे आगामी काळात अधिकाधिक पदवीधरांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराला सुरुवात झाल्याने सहाही जिल्ह्यांतील पदवीधरांशी थेट संवाद साधण्यावर तसेच त्यांच्या प्रश्नांची माहिती घेण्यावर भर दिला जात आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका ॲड. वंजारी यांनी व्यक्त केली आहे.











