श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मुंबई:8 आँक्टोबर 2026.
नागपूर विभागातील सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील 28 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (गट-ब, राजपत्रित) संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 23 कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती, यापूर्वी तदर्थ पदोन्नती मिळालेल्या 4 कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमित, तर दिव्यांग प्रवर्गातील एका कर्मचाऱ्याला काल्पनिक पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.


सन 2025-26 च्या निवडसूचीतून 8सहायक महसूल अधिकारी आणि 15 मंडळ अधिकारी, अशा एकूण 23 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती कोट्यातील उपलब्ध पदांवर ही पदोन्नती देण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
याशिवाय सन 2023-24 च्या निवडसूचीतून यापूर्वी नायब तहसीलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती मिळालेल्या 4 सहायक महसूल अधिकाऱ्यांची पदोन्नती सन 2025-2026 च्या पदोन्नती कोट्यात नियमित करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग प्रवर्गातील एका सहायक महसूल अधिकाऱ्याला नायब तहसीलदार संवर्गात काल्पनिक पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करण्यात आला आहे. या पदोन्नती विविध अटींच्या अधीन राहून देण्यात आल्या असून संबंधित न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.



महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रश्न वेळेत मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागपूर विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीची संधी मिळाली असून महसूल प्रशासनाचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल.”











