श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online.
नागपुर : 7 एप्रिल 2026.
नागपुर शहरातील CA रोडवर मेयो रुग्णालयाला लागून असलेल्या दोसर भवन मेट्रो स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी 15 जिलेटिनच्या कांड्या, 50 डिटोनेटर्स आणि 8 कनेक्टर सापडल्याने खळबळ उडाली आहे. अतिशय दाटीवाटीचा परिसर आणि संवेदनशील परिसरात ही स्फोटके सापडली आहेत. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह फॉरेन्सिक टीम आणि पेसोची टीम ही तिथे पोचली आहे.
तपासादरम्यान सर्व विस्फोटक साहित्य सुरक्षितपणे जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासासाठी अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा साठा आढळला तो परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जामा मशिद, ५०० मीटरवर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि दीड ते दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, घटनास्थळावरून आढळलेले सर्व साहित्य सुरक्षित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हे विस्फोटक येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले याचा शोध घेतला जात आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










