आँलंपिक मोहिमेसाठी महाराष्ट्राची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार-सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री)
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 1 मे 2026
काल दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी महादुला नगरपंचायत परिसरातील सेवानंद विद्यालय महादुला येथे उपसंचालक कार्यालय, क्रीडा व सेवा, नागपूर विभाग, ऍमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ तसेच नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 चे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार – सुनेत्रा अजित पवार (उपमुख्यमंत्री)

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्र आज देशातील ‘स्पोर्ट्स पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जात आहे. खेलो इंडिया युथ गेम्स, नॅशनल गेम्स आणि नॅशनल स्कूल गेम्स या तिन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध संघांनी आपले जेतेपद कायम ठेवत अव्वल स्थानाकडे वाटचाल केली आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्रानी आपला अपूर्व ठसा क्रीडा क्षेत्रातही उमटवावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राने ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार केली असून शहरांसमवेत ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडावेत यासाठी तालुका स्तरावर 5 कोटी, जिल्हा स्तरावर 25 कोटी आणि विभागीय स्तरावर 50 कोटी रुपयांचे क्रीडा संकुल शासन साकारत आहे.

स्व. अजित दादांनी कबड्डी या खेळाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा आणि त्यांनी निर्माण केलेला उज्वल वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. खेळाडूंना केवळ मैदानावरील सुविधाच नाही, तर मैदानाबाहेरील सुरक्षितता देणेही आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच गुणवंत खेळाडूंना १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत २५ वाढीव गुणचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूना आरक्षण ठेवले आहे. त्यांचा डेटा सेव्ह करण्यासाठी आपण ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. त्यांना थेट आर्थिक लाभ आणि विमा संरक्षण देणारी प्रणाली शासन राबवित असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
मैदानी खेळाच्या विकासासाठी स्व. अजीत दादा पवार यांनी दिलेले योगदान मोलाचे- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

यावेळी नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मैदानी खेळाच्या विकासासाठी स्व. अजीत दादा पवार यांनी दिलेले योगदान मोलाचे असुन राज्यात उत्क्रृष्ट खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
महादुला कोराडी येथे या स्पर्धा होण्याबाबत स्व. अजित दादां यांच्या समवेत झालेल्या संवादाच्या हळव्या आठवणींचा उल्लेख राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात केला. राज्यातील मैदानी खेळांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव त्यांनी केला. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही ग्रामीण भागातील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारी एक मोठी उपलब्धी आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या प्रतिष्ठित राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन नागपूर जिल्ह्यात होत आहे याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत राज्यभरातील 32 संघांचा सहभाग असून येथील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कबड्डी स्पर्धा कोराडीच्या क्रीडा परंपरेला नवे बळ देणारी ठरेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
कबड्डी खेळाची ओळख आता ऑलिम्पिकपर्यंत पोहचली आहे. कबड्डी हा फक्त खेळ नाही, तर आपल्या मातीतला संस्कार आहे. हा खेळ आपल्याला धैर्य, चपळता, एकाग्रता, संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघभावना शिकवतो. हा खेळ ऊर्जा आणि रोमांच यांनी भरलेला आहे. ग्रामीण भागातून घडलेले असंख्य कबड्डीपटू आज राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्ज्वल करत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नागपूर जिल्हा ग्रामीण कबड्डी असोशिएशन व विविध संघटनांनी ही स्पर्धा महादुला कोराडी येथे आयोजित करुन नवतरुणांना योग्य दिशा देण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले आहे. आपण सर्वांनी नागपूर ग्रामीणमध्ये क्रीडा चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प करू. “खेळाडू घडला तर देश घडतो” हा विचार आपण प्रत्येक गावात पोहोचवू या, असे त्यांनी सांगितले.


नागपुर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाच्या या स्पर्धा आयोजना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकात सांगितली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही आपल्या मनोगतात सहभागी कबड्डी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याच बरोबर महादुला कोराडी सारख्या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संकेत बावनकुळे व आयोजक टिम मधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
दिनांक 4 मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू राहणार आहे.
यावेळी नागपुर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,आ. आशिष देशमुख, माजी खा. सुबोध मोहिते, माजी आ. टेकचंद सावरकर, उपमहापौर लीला हाथीबेड, नगराध्यक्ष हेमलता सावजी ठाकूर(महादुला, नगराध्यक्ष) अजय अग्रवाल (कामठी नगराध्यक्ष) प्रसन्ना तिडके(मौदा नगराध्यक्ष) , मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, अनिल निधान, नरेंद्र धानोले माजी सरपंच कोराडी , अशोक धोटे, नगरसेविका आभा पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहराध्यक्ष अनील अहिरकर, श्रीकांत शिवणकर, तानाजी वनवे, अ. भा. कबड्डी फेडरेशन चे अध्यक्ष जितेंद्रसिंग ठाकूर, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष संकेत बावनकुळे, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभागाच्या उपसंचालक पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांच्यासह अन्य मान्यवर, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू, प्रेक्षक उपस्थित होते.
ChhatrapatiShriShivajiMaharajKabaddiChashak #mahadula Koradi #KabaddiBattle #Nagpur
#SunetraAjotPawar
drashishraodeshmukh
@sunetra.pawar
@ckbawankule
@sanjay_sawkare11
@drpankajbhoyar
@isbawankule












