अध्यात्मसमवेत जीवनमूल्य आणि कौशल्य विकासाचे कोराडी होईल महत्त्वाचे केंद्र
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर – 12 मे 2026.
मध्य भारतातील आदिशक्ती स्थळ म्हणून गणल्या जाणाऱ्या कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात सर्वात उंच 162 फूट हनुमान मूर्ती उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. आध्यात्मिक केंद्रासह बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगाराची दिशा देणारे शक्तिस्थळ म्हणून या मंदिर संकुलाची गणना झाली असून यात भव्य हनुमान मूर्तीची अमूल्य भर पडली आहे. या भव्य हनुमान मूर्ती संकुल परिसराचे लोकार्पण जून महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती महसूलमंत्री तथा श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण संकुल, महिला प्रशिक्षण केंद्र साकारून आध्यात्मिक केंद्रासह पर्यटन संकुलाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीने नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. या परिसरात हनुमानाची ही भव्य मूर्ती व परिसर येथील आध्यात्मिक केंद्रासह पर्यटनाला चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फाउंडेशनपासून 206 फूट उंचीची ही मूर्ती असून प्रत्यक्ष मूर्तीचा आकार 162 फूट आहे. 74 फूट उंच गदा आहे. या ठिकाणी “सेव्हन-डी हनुमान चालीसा प्रोजेक्शन” करण्यात येणार असून भाविकांना हनुमानजींच्या माध्यमातून बलोपासना, उपासना, गुणग्राहकता एकाग्रता ही जीवनमूल्य अनुभवता येतील. मूर्तीखाली हनुमानजींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. येथे उभारण्यात येत असलेल्या वीर हनुमानाच्या भव्य मूर्तीचा पाया महानिर्मितीद्वारे तयार करण्यात आला आहे.
येथे आई जगदंबेचे पुरातन मंदिर, रामायण कल्चरल सेंटर, भारत माता मंडपम, विजनिर्मिती प्रेझेंटेशन, अॅडव्हेंचर पार्क, किड्स झोन, बोटिंग प्रकल्प समवेत अद्वितीय कौशल्य विद्यापीठ साकारण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
याठिकाणी 500 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 800 विद्यार्थ्यांसाठी नाममात्र दरात शिक्षण, तीन लाख पुस्तकांची ई-लायब्ररी आणि आरोग्यसेवाही सुरू करण्यात येत आहे. या संपूर्ण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाने 214 कोटी 94 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल बावनकुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
परिसराच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लँडस्केपिंग आणि ‘बटरफ्लाय गार्डन’ (फुलपाखरू उद्यान) विकसित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, प्रकल्प सल्लागार अविनाश नवरकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












