श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर: 10 जून 2026.
विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या तारखेबाबत दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बुधवारी (दि. 10 जून) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती राजेश वाकोडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान शिक्षण संचालनालयाने 9 जून रोजी निर्गमित केलेले 22 जूनपासून शाळा सुरू करण्याचे परिपत्रक शासनाच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर करून त्यानुसार आदेश देण्याची विनंती केली.
मात्र, याचिकाकर्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ॲड. डॉ. जी. बी. कुलकर्णी यांनी शासनाच्या भूमिकेस विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासनाच्या भूमिकेबाबत असहमती व्यक्त केली.
यानंतर न्यायालयाने विदर्भातील शाळा 15 जून किंवा 22 जूनपासून सुरू करण्यासंदर्भातील शिक्षण संचालकांचे आदेश रद्द केले. तसेच, 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसारच शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विदर्भातील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 26 जूनपासून सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सुनावणीवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये विजय कोंबे, नागपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, अमरावती जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष गोकुलदादा राऊत, नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रमोद सुरोसे, प्रकाश सव्वालाखे, वर्धा जिल्हा शाखेचे कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंभोरकर तसेच नागपूर तालुका सचिव काजणे यांची उपस्थिती होती.विदर्भातील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 26 जूनपासून सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.











