श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online.
मुंबई: 9 सप्टेंबर 2026.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” राष्ट्र उभारणी आणि देशाच्या अखंडतेसाठी काम करत आहे. संघभूमी किंवा संघ कार्यालयावर मोर्चा काढणे सरकार कदापि सहन करणार नाही. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर मोर्चा काढून दाखवावा,” असा थेट इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. काँग्रेसने संघ कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चावर तीव्र संताप व्यक्त करत, बावनकुळे यांनी ‘वंदे मातरम्’वरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
सरकारविरोधात आंदोलन करायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पालकमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय किंवा रामगिरी येथे मोर्चे काढावेत. मात्र, संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढणे मान्य केले जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
‘वंदे मातरम्’वरून काँग्रेसवर हल्लाबोल
‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही मंत्री बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. वंदे मातरम् हे भारताची संस्कृती, संस्कार आणि वैभवशाली वारसा जगभरात मजबूत करणारे गीत आहे. त्याचा अपमान करणे म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाकडून देशाचा अपमान करणे होय, असा आरोप त्यांनी केला. 2029 च्या निवडणुकीत जनता या भूमिकेचा जाब विचारेल, असे सांगत भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावे लागेल, अशी आक्रमक भूमिका बावनकुळे यांनी मांडली.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये
राज्यातील पावसाच्या तुटीमुळे सोयाबीन, कापूस यांसह विविध पिके अडचणीत आली असून शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांत सुमारे 65 टक्के पाऊस झाला असून 35 टक्के तूट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
शर्तभंग करणाऱ्या जिमखान्यांवर कारवाई
मुंबई, नागपूर आणि राज्यातील अन्य भागांतील जिमखान्यांना देण्यात आलेल्या सरकारी जमिनींच्या वापराबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. ज्या उद्देशासाठी जमीन देण्यात आली, त्याच उद्देशासाठी तिचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक जिमखान्यांकडून लीजच्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचे तपासणीत आढळले आहे. मुंबईतील 16 जिमखान्यांसह नागपूर आणि राज्यातील अन्य जिमखान्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर शर्तभंग झाल्याचे आढळल्याने संबंधितांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिमखान्याच्या जमिनीवर लग्नसमारंभ किंवा अन्य अनधिकृत पद्धतीने सरकारी जमिनीचा वापर केला जात असेल तर तो थांबविणे ही सरकारची जबाबदारी आहे. शर्ती नियमित करताना संबंधितांकडून यापुढे नियमांचे उल्लंघन न करण्याची हमी घेतली जाईल. पुन्हा शर्तभंग झाल्यास जमीन परत घेऊन जिमखाना बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री बावनकुळे यांनी दिला.
मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी मोठे काम केल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी मराठा समाजाला विशेष आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही आणि आरक्षण रद्द झाले. त्यानंतरही फडणवीस आणि शिंदे यांनी मराठा समाजासाठी ठोस भूमिका घेतली.
EWS च्या 10 टक्के आरक्षणात मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत असून, ओबीसी समाजातील 353 जातींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाचे संरक्षण आणि मराठा समाजाला आरक्षण, या दोन्ही जबाबदाऱ्या सरकार पार पाडत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
क्रीडा प्रमाणपत्र गैरव्यवहारावर कठोर कारवाई
क्रीडा प्रमाणपत्र गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने स्पष्ट धोरण निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काल मंत्रिमंडळात यासंदर्भातील प्रस्ताव मांडला. क्रीडा कोट्यातून अपात्र व्यक्तीला नोकरीचा लाभ मिळू नये यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. गैरप्रकार आढळल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करणे, प्रमाणपत्र रद्द करणे, नोकरी रद्द करणे, निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.











