श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/ नागपुर : 18 सप्टेंबर 2026.
नागपूर ते बोधगया दरम्यान धावणा या ऐतिहासिक व बौद्ध बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘दीक्षाभूमी एक्स्प्रेस’चे रूपांतर तातडीने सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये करण्यात यावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस नियमित सुरू करावी, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिफारशी नंतर ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या रेल्वे राज्यमंत्री वी. सोमन्ना यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत रंजन कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रवासाचा वेळ कमी करून वारंवारता वाढवण्याची गरज
नागपूरसह संपूर्ण विदर्भातील लाखो बौद्ध अनुयायी, भिक्खू संघ आणि अभ्यासकांसाठी ज्ञानभूमी बोधगया हे परम पावन व सर्वोच्च श्रद्धेचे केंद्र आहे. सध्या धावणा या दीक्षाभूमी एक्स्प्रेसमुळे या प्रवासाला गती मिळाली असली, तरी मर्यादित फेऱ्या आणि प्रवासाचा दीर्घ कालावधी यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गाडीला सुपरफास्टचा
दर्जा देऊन प्रवासाचे तास कमी करण्यात यावेत. तसेच आठव- ड्यातून किमान तीन दिवस ही सेवा उपलब्ध झाल्यास धम्मदीक्षा, विहारदर्शन, संशोधन आणि धार्मिक उपक्रमांसाठी प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी निवेदनात नमूद केले. विशेष म्हणजे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवरून लाखों अनुयायी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिन व त्रिपिटक सोहळ्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करा
नागपूर येथे साजरा होणारा ऐतिहासिक ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा’ आणि बोधगया येथे संपन्न होणारा ‘आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळा’ या दोन्ही जागतिक स्तरावरील महोत्सवांना देशभरातून लाखो अनुयायी उपस्थित राहतात. या काळात रेल्वे प्रशासनावर प्रचंड ताण येतो आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने दोन्ही सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर तत्काळ विशेष रेल्वे गाड्यांचे स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. रेल्वे मंत्रालयाने या जनभावनेची गंभीर दखल घेत दीक्षाभूमी एक्स्प्रेस सुपरफास्ट करणे, वारंवारता वाढवणे आणि विशेष गाड्या सुरू करणे या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असा विश्वास यावेळी अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.












