पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस आयुक्तांनी केले निर्देश जारी
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर: 12 सप्टेंबर 2026.
नागपूर शहरातील OYO, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेमध्ये बेकायदेशीर घडामोडींना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून ‘ऑपरेशन शक्ती’ राबविण्यात येत असून, आता जारी झालेल्या नव्या अधिसूचनेनुसार मानवी तस्करी बेकायदेशीर देहविक्री आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिसूचना जारी केली आहे. आज, सप्टेंबर 2026 ते नोव्हेंबर 2026 या कालावधीसाठी हे नियम लागू राहतील.
या अधिसूचनेतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस मालक/व्यवस्थापकांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
ऑपरेशन शक्तीअंतर्गत प्रमुख मार्गदर्शक नियम असे :
झिरो टॉलरेंस बोर्ड अनिवार्य :
प्रत्येक OYO व हॉटेलच्या मुख्य भागात ‘मानवी तस्करी आणि बेकायदेशीर कामांना थारा दिला जाणार नाही’ अशा आशयाचा ‘झिरो टॉलरेंस’ चा स्पष्ट व ठळक बोर्ड लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
कडक ओळख पडताळणी:
ग्राहकांना खोली देण्यापूर्वी त्यांचे मूळ ओळखपत्र (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) तपासून संपूर्ण माहिती रजिस्टर किंवा डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवणे बंधनकारक आहे. ओळखपत्रावर जन्मदिनांक व स्थायी पत्ता असणे आवश्यक आहे. (पॅन कार्ड सामान्यतः स्वीकारले जाणार नाही).
अविवाहित जोडप्यांसाठी नियम : दोन्ही व्यक्ती सज्ञान (18वर्षे किंवा त्याहून अधिक) असल्यास संमतीने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर आहे, मात्र त्यांची वयाची व निवासाची कडक शहानिशा करून रजिस्टरमध्ये नोंद घेणे अनिवार्य असेल.
CCTV देखरेख व 1 वर्षाचा बॅकअप :
हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून लॉबीपर्यंत 24 तास सीसीटीव्ही सुरू असावेत व त्याचा फुटेज रेकॉर्ड किमान 1 वर्षाचा असावा. कॅमेरे नादुरुस्त असल्यास त्वरित दुरुस्त करणे बंधनकारक आहे.
अल्पवयीन व्यक्तींबाबत नियम :
अल्पवयीन व्यक्तींच्या बाबतीत कडक पडताळणी केली जाईल आणि पालक सोबत असल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
कर्मचाऱ्यांची माहिती :
हॉटेल्समधील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ओळखपत्रे, रहिवासी दाखले व फोन नंबरची अद्ययावत फाईल मालकांकडे असणे आवश्यक आहे.
बोगस ब्रँडिंगवर कारवाई :
नागपूर पोलीस आणि OYO कंपनीने संयुक्त कारवाई करून अनधिकृतपणे ‘OYO’ चे नाव वापरणाऱ्या 20 पेक्षा जास्त हॉटेल्सचे साईनबोर्ड हटवले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.












