शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी चा नागपुरात अभिजीत वंजारी यांनी मांडला लेखाजोखा!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर: 10 आँक्टोबर 2026.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, संशोधनासाठी आर्थिक पाठबळ मिळावे आणि शैक्षणिक संस्थांच्या समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी आमदारकीच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सातत्याने प्रयत्न केले. महाज्योती, सारथी आणि बार्टी या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच पीएच.डी. अनुदानासाठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करून घेण्यासोबतच वसतिगृहांचे प्रश्न, सार्वजनिक वाचनालयांचे अनुदान आणि दिव्यांगांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला, अशी माहिती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दिली.
नागपुरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मागील सहा वर्षांत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आणि विद्यार्थीहितासाठी केलेल्या कामांचा आढावा मांडला. शिक्षणाच्या संधी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मर्यादित राहू नयेत, विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि शैक्षणिक संस्थांना सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यावर त्यांनी भर दिला.
शिक्षण क्षेत्रासाठी निधीची तरतूद
शिक्षण हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर अधिकाधिक खर्च होणे आवश्यक आहे. नागपूर विद्यापीठाच्या विकासासाठी 107 कोटी रुपये, तर टेक्नॉलॉजी पार्कसाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वंजारी यांनी सांगितले. विद्यापीठांचा विकास, संशोधनाला प्रोत्साहन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्पर्धा परीक्षार्थींना वाचनालयांचा आधार
ग्रामीण आणि शहरी भागांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सार्वजनिक वाचनालयांना 60 टक्के वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. सार्वजनिक वाचनालये ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची केंद्रे असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्यांचा मोठा लाभ होतो. वाचनालयांच्या माध्यमातून अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
वसतिगृहांपासून संशोधन अनुदानापर्यंत पाठपुरावा
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी विविध शासकीय संस्थांच्या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. महाज्योती, सारथी आणि बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधनासाठी मिळणारे अर्थसाहाय्य वाढावे, तसेच पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक अनुदान उपलब्ध व्हावे, यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केल्याचे वंजारी यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग व्यक्तींना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणे, त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे आणि त्यांना शिक्षणासह विविध क्षेत्रांत समान संधी मिळवून देणे, या बाबींनाही आपण प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविताना शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन यांच्याशी संवाद महत्त्वाचा आहे. शैक्षणिक संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि संशोधनाला चालना देणे, या बाबी भविष्यातही महत्त्वाच्या राहतील, असे वंजारी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाशी संबंधित मुद्दे सातत्याने मांडून त्यावर मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.











