श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मुंबई : 12 एप्रिल 2026.
लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तर सकाळी 11 ते 2 दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल.

पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मराठीसह हिंदी, गुजराती आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश… ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी – अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहे.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदि अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल ॲंन्ड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेन्ड्स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी … इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. 2008 मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना 2000-2001 मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
2002 सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2013सालापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतले प्यारेलाल, कल्याणजी आनंदजीमधले आनंदजी, अन्नू मलिक, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन आणि सोनू निगम यांना मिळाला आहे.












