श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 12 आँगष्ट 2026.
जागतिक ख्यातीचे श्रद्धास्थान असलेल्या कामठी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलला जपानच्या सुझुयासु ग्लोबल नेटवर्किंग सर्व्हिसेस प्रा. लि.चे माजी महाव्यवस्थापक व प्रसिद्ध बिझनेस कन्सल्टंट सुझुकी यासुमी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून आपला श्रद्धाभाव अर्पण केला. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मुख्य संरक्षक ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी सुझुकी यासुमी यांचे भारतीय परंपरेनुसार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उभयतांमध्ये झालेल्या बैठकीत तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम, आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रे आणि औद्योगिक विकासात्मक उपक्रम संयुक्तपणे राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या संस्मरणीय भेटीबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “कदाचित भगवान बुद्धांच्याच प्रेरणेमुळे आणि अनेक योगायोगांमुळे मी आज या पवित्र भूमीत येऊ शकलो. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच अत्यंत आनंददायी आणि मनःशांती देणारा आहे. भगवान बुद्ध यांनी मला येथे पोहोचण्यास मदत केली आणि ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी मला असीम आदरातिथ्य दिले. त्यांच्या धम्मकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. मला पूर्ण खात्री आहे की, नजीकच्या काळात मी या पवित्र वास्तूला पुन्हा नक्कीच भेट देईन. सुझुकी यासुमी पुढे म्हणाले की, “ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे केवळ भारताचेच नाही, तर संपूर्ण जगभर तथागत भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती आणि सत्याचा संदेश पसरवीत आहे. ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या संकल्पनेतून आणि अथांग परिश्रमांतून आज जपानसारख्या देशांमध्ये तसेच विश्वभर भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार होत आहे. अशा महान आणि पावन भूमीवर येण्याची व या भूमीला नतमस्तक होण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचे बौद्ध धम्माच्या प्रचाराचे कार्य अतुलनीय आहे, असेही ते म्हणाले. या आंतरराष्ट्रीय भेटीमुळे ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून भगवान बुद्धांचे विचार जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या मोहिमेला अधिक बळ मिळणार असून, परिसरातील बौद्ध बांधव व नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.”











