ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्रात १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
भव्य सुवर्णपगोड्याच्या सान्निध्यात शेकडो साधकांनी घेतला धम्मलाभ
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 22 सप्टेंबर 2026.
विपश्यना ही भगवान बुद्धांनी मानवाला दिलेली अशी वैज्ञानिक ध्यानपद्धती आहे, जी आपल्याला अंतर्मनाशी जोडते. योगसाधनेप्रमाणेच विपश्यनेलाही कुठल्या एका धर्मापुरते मर्यादित न ठेवता, मानवकल्याणाचा वैश्विक मार्ग म्हणून पाहिले पाहिजे. अश्या भावना ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर च्या 10 व्या स्थापना दिना निमित्त व्यक्त केल्या.
त्या पुढे म्हणाल्या कि आजचा हा 10 वा वर्धापन दिन केवळ एका भव्य इमारतीचा उत्सव नसून नागपूरच्या पावन भूमीवर विपश्यनेचा डंका वाजल्याचा आणि धम्माचा विचार घराघरांत पोहोचल्याचा उत्सव आहे. पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका यांच्या अथांग प्रेरणेतून हे केंद्र साकार झाले. वडिलांच्या निधनानंतर मानवी जीवन किती अनित्य आहे, याची जाणीव झाली आणि त्यातूनच गुरुजींप्रती कृतज्ञता म्हणून हे विपश्यना केंद्र आम्ही मानवसेवेसाठी समर्पित केले. विपश्यना हा कुठलाही चमत्कार नसून मन शुद्ध करण्याची प्रयोगशाळा आहे. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व मानवांसाठी हे आत्मनिरीक्षणाचे द्वार खुले आहे. आधुनिक युगातील ताणतणाव, निराशा आणि विकार दूर करून जीवनाला खरी शांती व योग्य दिशा देण्याचे कार्य हे केंद्र अविरत करत राहील. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या आयुष्यातील 10 दिवस स्वतःसाठी काढून या शांतीमार्गाचा लाभ घ्यावा.
धम्मनगरी नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीनंतर बौद्ध धम्माचे व जागतिक शांतीचे सर्वात मोठे आकर्षण ठरलेल्या कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील आंतरराष्ट्रीय विपश्यना ध्यान केंद्राचा 10 वा वर्धापन दिन आज अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक दिनानिमित्त आयोजित विशेष एकदिवसीय सामूहिक ध्यान साधना शिबिरात कामठी, नागपूरसह विदर्भातील शेकडो साधक-साधिका, सहायक आचार्य, बाल शिबिर शिक्षक आणि धम्मसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

22 सप्टेंबर 2017 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले होते ऐतिहासिक लोकार्पण
22 सप्टेंबर 2017 चा दिवस या केंद्रासाठी ऐतिहासिक ठरला होता. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नागपुरातून केली होती. सकाळी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर दुपारी त्यांनी कामठीत येऊन या भव्य विपश्यना केंद्राचे लोकार्पण केले होते.
10 एकर परिसरातील वास्तुकला आणि ‘द्वितीय बुद्ध शासना’चा आधारस्तंभ
ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापक अध्यक्षा, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या अथक प्रयत्नांतून 10 एकर विस्तीर्ण निसर्गरम्य भूमीवर हे केंद्र साकारले आहे.
पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका यांच्या प्रेरणेतून उभारलेले हे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरून सुरू केलेल्या ‘द्वितीय बुद्ध शासना’चा एक सशक्त स्तंभ बनले आहे. गेल्या 9 वर्षांत सर्व धर्म, पंथ आणि समाजातील हजारो नागरिकांनी 10 दिवसांचे निवासी शिबिर पूर्ण करून जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवले आहे.
शेकडो साधकांची दिवसभर ध्यान साधना

वर्धापन दिनानिमित्त आयोजित या शिबिरात सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 या वेळेत शेकडो साधकांनी पूर्ण मौनात राहून श्वास आणि शरीराच्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करत आत्मपरीक्षणाचा सराव केला. आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात राग, भीती आणि चिंतेवर नियंत्रण मिळवून मन शांत करणारी ही अडीच हजार वर्षे जुनी वैज्ञानिक विद्या साधकांसाठी संजीवनी ठरली. या विपश्यना शिबीराचे संचालन सहायक आचार्य सिद्धार्थ राऊत, श्रीमती कल्पना सोमकुवर व माटे गुरूजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेकडो साधक आणि धम्मसेवकांनी ‘भवतु सब्ब मंगलम्’ या मंगलमैत्री सूत्राच्या घोषात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची व शांतीची कामना केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ओगावा सोसायटी तसेच ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर येथील रेखा भावे, वंदना आळे, शालु सावतकर, सुमन घरडे, प्रतिभा वासनिक, वणीता गजभिये, शितल मेश्राम, संगीता मानवटकर, भुमीका लोणारे, आम्रपाली रामटेके, छाया, विनय बांबोर्डे, सुनिल वानखेडे, निलेश वैद्य, सचिन नेवारे, अमोल नगरकर, राजेश शंभरकर, चंदु कापसे, अनिल कांबळे, यश बंसोड, अजित बागडे, अक्षय नागदेवे, बबन देवळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.












