दुष्काळी परिस्थितीच्या सर्वेक्षणावर भर देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली आमधरेंनी मागणी!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 23 सप्टेंबर 2026.
नागपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसातील अनिश्चितता, पिकांची स्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतितात्काळ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन शासनाने दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण करावे आणि आवश्यक मदत व उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. पावसाचे असमान वितरण, पर्जन्यमानातील तफावत आणि पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने केवळ पावसाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे आमधरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शासनाकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे.
नागपुर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांच्या हिताचा विचार करून दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. तसेच दुष्काळी परिस्थितीचे निकष, प्रत्यक्ष पिकांची स्थिती आणि पाणीटंचाईचा आढावा घेऊन आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हुकुमचंद आमधरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पिकांची स्थिती, उपलब्ध पाणीसाठा, भूजल पातळी आणि पिण्याच्या पाण्याची गरज यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. ज्या भागात पावसाअभावी किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतीसाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन वेळेत करणे गरजेचे आहे. प्रशासनाने संबंधित विभागांच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही करावी, असे हुकुमचंद आमधरे यांनी म्हटले आहे.












