जिल्हाधिकाऱ्यांकडून दीक्षाभूमीवरील सोयीसुविधांचा आढावा
श्री सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782). मुख्य संपादक. Vansh News Digital Web portal online.
नागपूर: 26 आँक्टोबर 2026 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करता याव्या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या 8 कोटी 92 लक्ष रुपयांचा आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली.
दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. यंदा दसरा 20 ऑक्टोबर रोजी असून, 18 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमी परिसरात सर्वाधिक गर्दी अपेक्षित आहे. त्यादृष्टीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व व्यापक व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रथमच सुमारे 8 कोटी 93 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून त्यातून येथे अनुयायांसाठी तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच अंथरूण-पांघरूण, पंखे, कुलर, टेबल, पुरेशा प्रकाशासाठी एलईडी व्यवस्था, शुद्ध पाण्याचे नियोजन, स्वच्छता आणि फिरती शौचालये यांसारख्या सुविधांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासोबतच तात्पुरता आरोग्य कक्ष, रुग्णवाहिका, औषधे, रात्रीच्या वेळी प्रकाश व सुरक्षा व्यवस्था, जनरेटर, सीसीटीव्ही, पोलीस मदत कक्ष, स्वयंसेवकांची व्यवस्था आणि दीक्षाभूमी परिसरात मुरुमीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी समाज कल्याण विभाग कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम पाहत असून येथील सोयी-सुविधांच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे.


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आज या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी उपस्थित होते.
दीक्षाभूमी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतलेल्या या पवित्र स्थळी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दिवशी लाखो अनुयायी येतात. या काळात येथील परिसरात महिला, वृद्ध, लहान मुले, दिव्यांगांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात येत आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यंदा सर्वंकष व्यवस्था उभारण्याच्या सूचना या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. उपलब्ध सुविधा आवश्यक कामे व उपाययोजनांचा
सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.












