श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 27 सप्टेंबर 2026.
आगामी 20 ऑक्टोबर 2026 रोजी साजरा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता ड्रॅगन पॅलेस येथील सभागृहात एका महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


यासंदर्भात कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी संबंधित सर्व शासकीय विभागांना उपस्थित राहण्याचे अधिकृत पत्र जारी केले आहे.

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीला भेट देतात. दीक्षाभूमीसोबतच कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसलाही भाविक मोठ्या संख्येने भेट देत असल्याने या परिसराला एका भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था चोख राखणे, तसेच येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे विविध सोयी-सुविधांचे नियोजन केले जात आहे.
या पूर्वतयारी आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नागपुर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेसह ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण (MSEDCL), उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) आगार व्यवस्थापक यांना आवश्यक ती माहिती व नियोजनासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.











