श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी/नागपुर : 12 आँक्टोबर 2026 .
विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये अश्विन नवरात्र महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजाअर्चा करून देवीचे आशीर्वाद घेतले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असून, शेतकऱ्यांनाही या कठीण परिस्थितीशी लढण्याची शक्ती मिळावी, असे साकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवीच्या चरणी घातले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार परिणय फुके, आमदार डॉ. राजीव पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी येथे शारदीय नवरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदाही नवरात्रोत्सवाला धार्मिक परंपरेनुसार उत्साहात प्रारंभ झाला असून, दुसऱ्या दिवशी आई श्री महालक्ष्मी जगदंबेच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ‘जय माता दी’ आणि ‘आई जगदंबेचा विजय असो’ अशा जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच इतर राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने कोराडी येथे दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यज्ञ, जप आणि हवनाने मंदिर परिसर भक्तिमय
अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या आराधनेसाठी यज्ञ, जप आणि हवनाचे विधी पार पडत असून, वैदिक मंत्रोच्चारांमुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू राहणार असून, विविध पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देवीची आराधना केली जाणार आहे.










