श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचा उपक्रम
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मुंबई : 13 जुलै 2026
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्यावतीने जेजुरी येथे घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमांतर्गत वारकरी बंधू-भगिनींना 15 हजार हायजिन किटचे (स्वच्छता साहित्य) निःशुल्क वितरण करण्यात आले.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे सचिव दत्तूजी समरीतकर तसेच संस्थानाचे विश्वस्त व मुख्य पुजारी केशवराव फुलझेले , आमदार विक्रांत पाटील, भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रामुख्याने उपस्थित होते.

वारीदरम्यानचा प्रदीर्घ पायी प्रवास, बदलते हवामान आणि स्वच्छतेच्या मर्यादित सुविधा लक्षात घेता वारकऱ्यांना आवश्यक स्वच्छता साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत या भव्य वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,”आषाढी वारी ही महाराष्ट्राची अत्यंत पवित्र आणि शतकानुशतके चालत आलेली थोर सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात. या प्रदीर्घ प्रवासात वारकरी भाविकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांना स्वच्छतेच्या साधनांची कमतरता भासू नये, हा आमचा उद्देश आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्यात अग्रेसर राहिले आहे. यंदा प्रथमच संस्थानच्या वतीने जेजुरी येथे 15 हजार वारकऱ्यांना हायजिन किटचे वितरण करण्यात आले. विदर्भातील शक्तीपीठाकडून विठूमाऊलीच्या भक्तांसाठी विणलेला हा सेवाबंध आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी येथे वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. महिला सक्षमीकरण, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि शैक्षणिक मदतीमध्ये संस्थानचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. याच सेवा मालिकेचा एक भाग म्हणून यंदा प्रथमच जेजुरी येथे वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.”
वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची थोर परंपरा जपत, लाखो भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारा हा उपक्रम जेजुरी परिसरासह वारीतील भाविकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला आहे.









