श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 16 जुलै 2026.
नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या मानद-वन्यजीव रक्षक पदांच्या नियुक्ती प्रक्रियेवर वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले सर्पमित्र व वन्यजीव संरक्षक दद्दू गणवीर यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. यावेळी नवीन व पात्र व्यक्तींना संधी दिली जाईल, असा निर्णय प्रशासन व संबंधित मंत्री महोदयांनी जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष नियुक्त्यांमध्ये एकाही नवीन व्यक्तीला संधी न देता पूर्वीच्या व्यक्तींनाच पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दद्दू गणवीर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य व गुणवत्तेच्या आधारे झाली नसल्यास या संपूर्ण प्रक्रियेवर अधिकृत हरकत (Objection) नोंदविण्यात येणार असून, नियुक्ती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भातील सविस्तर निवेदन व तक्रार महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF), मुख्य वनसंरक्षक (CCF), वनमंत्री, वन विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर संबंधित मान्यवरांकडे पाठविण्यात आल्याची माहिती दद्दू गणवीर यांनी दिली. तसेच येत्या काही दिवसांत या नियुक्तीविरोधात लेखी हरकत, आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत आक्षेप आणि इतर वैधानिक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“वन्यजीव संरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात राजकारणाला स्थान नसावे. प्रत्यक्ष काम करणारे, पात्र, अनुभवी व निस्वार्थी कार्यकर्त्यांनाच संधी मिळाली पाहिजे. मनमानी, पक्षपातीपणा किंवा राजकीय दबावावर आधारित निर्णय स्वीकारले जाणार नाहीत,” अशी भूमिका दद्दू गणवीर यांनी मांडली.
वन विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय्य निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन, निवेदने आणि इतर कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे









