श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मौदा/नागपुर : 6 जुलै 2026.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून 1330 नागरिकांनी लाभ घेतला.


यावेळी बोलताना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल बोलतांना म्हणाले की, आरोग्ग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान झाल्यास योग्य वेळी उपचार करणे शक्य होते. अशा प्रकारची निशुल्क आरोग्य शिबिरे नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडतांना आनंद होतो. यावेळी राज्यातील कोणत्याही नागरिकाने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, नियमित आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरात विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात 544 लाभार्थींना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 248 नागरिकांची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्डे तयार करण्यात आली, तर 236 रुग्णांची विविध शस्त्रक्रियांसाठी नोंदणी करण्यात आली.
शिबिरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार, औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार टेकचंद सावरकर आणि माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, कैलास बरवटे, माजी सभापती नंदा लोहबरे, नरेश मोटघरे, सरपंच वैशाली लेंडे,उपसरपंच चंद्रशेखर गभने, ग्रा. पं. सदस्य सचिन कमाले, शुभम गभने,पल्लवी मोटघरे, दुर्गा येळणे, किरण डांगरे, प्रियंका डांगरे, रवी चव्हाण, पूजा हटेवार, सुनंदा दिवटे, भगवान बावनकुळे, चेतन खडसे, खेमराज चापले, महावीर वीरखेडे, कीर्ती पायतोडे, चिंतामण सारवे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, चष्मे, आयुष्मान भारत योजनेचा लाभ तसेच शस्त्रक्रियेसाठी नोंदणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.












