गणरायाचे विसर्जन प्रसंगी
झाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपूर:25 सप्टेंबर 2026.
बारा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीतील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे आज भावपूर्ण वातावरणात कोराडी तलावात विसर्जन करण्यात आले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर ओढवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीतून राज्याला बाहेर काढावे आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सुखी ठेवावे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.


यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढावे, शेतकऱ्यांना बळ द्यावे आणि राज्य सुखी-समृद्ध ठेवावे, अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्राताई पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी परिस्थितीची पाहणी करत असून प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक बाबीची नोंद घेतली जात आहे. “शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कुठेही चूक होऊ नये, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या बैठका सातत्याने घेतल्या जात आहेत. परिस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत निर्णय घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) काढण्याचे सांगितले असून त्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.
“दुष्काळाच्या या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल. पंचनामे, पाहणी आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अहवालांच्या आधारे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थितीवरून विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकारणावरही बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. “अशा संकटाच्या काळात दुष्काळावर राजकारण करणे योग्य नाही. विरोधकांनी राजकारण न करता सरकारसोबत येऊन शेतकऱ्यांसाठी काम करावे. त्यांना सद्बुद्धी मिळो, असे ते म्हणाले.
12 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर बाप्पाला निरोप देताना बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. “गणपती बाप्पा आम्हा सर्वांना या दुष्काळसदृश परिस्थितीतून बाहेर काढो आणि महाराष्ट्र पुन्हा सुखी, समृद्ध व संपन्न होवो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.












