कामठीत फुले-आंबेडकर जयंती महोत्सव व ‘बरिएमं’चा 20 वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोत्सात संपन्न
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 11 एप्रिल 2026.
आज देशात आणि राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. सर्वसामान्यांवर सत्ताधाऱ्यांकडून दडपशाही होत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या सर्व अन्यायकारक परिस्थितीविरोधात ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ (बरिएमं) आता मूकदर्शक राहणार नाही, तर रस्त्यावर उतरून याविरोधात तीव्र लढा देईल, अशी आक्रमक आणि खणखणीत घोषणा राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा ‘बरिएमं’च्या संयोजिका ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केली.

स्थानिक दादासाहेब कुंभारे परिसरातील एमटीडीसी सभागृहात शनिवारी (दि. 11 एप्रिल) महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आणि ‘बहुजन – रिपब्लिकन एकता मंच’चा 20 वा स्थापना दिन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी सद्यस्थितीतील ज्वलंत प्रश्नांवरून संघर्षाचे रणशिंग फुंकले.


80 % समाजकारणातून उभारणार जनआंदोलन: ॲड. सुलेखाताई कुंभारे( माजी राज्यमंत्री)
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या, “बहुजन रिपब्लिकन एकता मंच हा केवळ राजकारण करणारा पक्ष नसून, तो 80 टक्के समाजकार्य आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वावर चालणारा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी शोषित, वंचित आणि विशेषतः महिलांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले. पण आज त्याच घटकांवर पुन्हा अन्याय होताना दिसत आहे. वाढती महागाई आणि सर्वीकडे फोफावत असलेला भ्रष्टाचार तसेच आज कुठेही महिला सुरक्षित नाहीत. या वाढत्या दडपशाहीच्या विरोधात आम्ही फुले-आंबेडकरी विचारांनी आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारणार आहोत.” असेही सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या.
महामानवांचे विचार संघर्षातून कृतीत आणण्याची वेळ: पद्मश्री खा.डॉ. विकास महात्मे

या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे म्हणाले, “सद्यस्थितीत समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी केवळ महामानवांची जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्यांचे विचार प्रत्यक्ष संघर्षातून कृतीत आणावे लागतील. भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार हे समाजाला लागलेले ग्रहण आहे.वेगळ्या विदर्भाचे आंदोलन संपले नसुन त्याला पुन्हा पेटवण्याची गरज असुन वेगळ्या आंदोलनाचे नेतृत्व सुलेखाताई कुंभारे यांनी करावे अशी विनंती माजी खा. विकास महात्मे यांनी यावेळी केले. देशातील सामाजिक प्रश्नांवर ॲड. सुलेखाताई कुंभारे आणि त्यांच्या ‘बरिएमं’ने घेतलेली ही लढाऊ भूमिका खऱ्या अर्थाने महामानवांना वाहिलेली आदरांजली ठरेल.”असेही माजी खा. महात्मे म्हणाले.
अन्यायाविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज: रिपब्लिकन नेत्यांचे एकमत
या ऐतिहासिक मंचावर उपस्थित असलेल्या विविध रिपब्लिकन नेत्यांनीही याच ज्वलंत प्रश्नांवरून आवाज उठवला.

यावेळी पिरीपा चे राष्ट्रीय अध्यक्ष,प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले, “देशात वाढलेली दडपशाही आणि भ्रष्टाचार याविरोधात आवाज उठवण्यासाठी संपूर्ण बहुजन समाजाने एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सुलेखाताईंनी छेडलेला हा लढा केवळ एका पक्षाचा नसून तो संपूर्ण उपेक्षित समाजाचा लढा आहे.”
”सुलेखाताईंनी या जनआंदोलनाचे विदर्भाचे नेतृत्व करावे; आम्ही पाठीशी खंबीर उभे!” – ज्ञानेश्वर रक्षक यांची साद

या विचारमंचावरून बोलताना गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी आवाहन केले. सद्यस्थितीत समाजाला भेडसावणारी वाढती महागाई, फोफावत असलेला भ्रष्टाचार, वाढती दडपशाही आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना यावर त्यांनी आपल्या भाषणातून तीव्र चिंता व्यक्त केली. या अन्यायाविरोधात ‘बरिएमं’ने उभारलेल्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत ते म्हणाले, “या सर्व ज्वलंत प्रश्नांवरून ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी जो आक्रमक लढा उभारण्याचा संकल्प केला आहे, त्या जनआंदोलनाचे त्यांनी आता संपूर्ण विदर्भाचे नेतृत्व करावे. उपेक्षित समाजाला आणि जनसामान्यांना आज त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची नितांत गरज आहे. सुलेखाताईंनी हाती घेतलेल्या या न्यायाच्या आणि अधिकाराच्या लढ्यात आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी आणि खंबीरपणे उभे आहोत,” अशी मोठी ग्वाही ज्ञानेश्वर रक्षक यांनी यावेळी दिली. त्यांच्या या आवाहनाला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक आणिपरमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक रमेश नखाते यांनीही आपल्या मनोगतातून महागाई आणि विषमतेविरुद्ध लढण्यासाठी सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा बरिएमं पदाधिकारी यांचा झाला सत्कार

या सोहळ्याचे औचित्य साधून बरिएमंचे विदर्भ महासचिव अजयभाऊ कदम, नगरसेवक द्वय आकाश भोकरे आणि नियाज कुरेशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हेच पदाधिकारी आता आगामी जनआंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंबेडकरवादी नेते माजी जि. प. सदस्य दिनेश बन्सोड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह बरिएमं मध्ये झाला भव्य पक्षप्रवेश!

जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी आणि सुलेखाताईंच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवत, दिनेश बन्सोड यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘बरिएमं’मध्ये जाहीर प्रवेश केला आणि संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
या महत्त्वपूर्ण घडामोडीचे मंचावर उपस्थित मान्यवरांनी आणि सभागृहातील कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी‘बरिएमं’च्या संयोजिका ॲड. सुलेखाताई कुंभारे, उद्घाटक माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पिरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्यासह मंचावर उपस्थित सर्व दिग्गजांच्या हस्ते दिनेश बन्सोड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अत्यंत दिमाखदार सत्कार करण्यात आला. बन्सोड यांच्या या शक्तिप्रदर्शनासह झालेल्या पक्षप्रवेशामुळे पक्षात मोठे नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनेची ताकद आता अधिकच दुणावली आहे.
याप्रसंगी मंचावर रिपब्लिकन नेते विनायक जामगडे, आंबेडकरवादी रिपब्लिकन नेते दिनेश बन्सोड आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश घरडे यांची प्रमुख उपस्थिती होती नगरसेवक आकाश भोकरे, नियाज कूरेशी, माजी उपाध्यक्ष अजय कदम यांची.
महागाई, भ्रष्टाचार आणि दडपशाहीविरोधातील या ‘बरिएमं’च्या नव्या एल्गाराला सभागृहात उपस्थित जनसमुदायाने उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमाला कामठी व परिसरातील नागरिक, आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जण गण मन या राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव फुसे, संचालन विनोद जुमडे आणि राहुल बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रजनी लिंगायत यांनी केले.












